सीजेपी नेते आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात; मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमांवर टीका

Foto
गुवाहाटी : कॉकोरच जनता पार्टीच सह-संयोजक आशुतोष रांका आणि त्यांच्या टीमला आसाममध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी स्वतः याची माहिती दिली आहे. अभिजीत दीपके यांनीही याचा निषेध केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, "आसाम पोलिसांनी रांका आणि सीजेपी टीमला ताब्यात घेतले असून त्यांना अज्ञात ठिकाणी घेऊन जात आहेत.

दीपके यांच्या माहितीनुसार, रांका आणि त्यांची टीम स्वयंसेवकांसोबत एका छोट्या बैठकीसाठी आसामला जात होती.

पोलिसांच्या कारवाईनंतर आशुतोष रांका यांनी मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांच्यावर निशाणा साधला. "आसाममधील शाळांचे भीषण वास्तव जर आम्ही समोर आणले, तर इथल्या दुरवस्थेची पोलखोल संपूर्ण देशासमोर होईल, याचीच भीती हिमंता बिस्वा सरमा यांना सतावत आहे," असा आरोप रांका यांनी केला. 

"काझीरंगामधील स्थानिक जनतेचे मूलभूत हक्क सर्रास हिरावून घेतले जात आहेत. तिथली जमीन, जलस्रोत आणि समृद्ध जंगले स्थानिकांकडून बळजबरीने हिसकावून बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घातली जात असल्यामुळेच सरकार घाबरले आहे, असा आरोप रांका यांनी केला.

"ज्ञानेशच्या नावाखाली आसाम निवडणुकीत झालेला गैरप्रकार उघडकीस येईल, याची हिमंता मामांना भीती वाटते. एकाच गावातील लोकांना तीन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागून विधानसभा मतदारसंघांच्या सीमा कशा तयार केल्या गेल्या. एसआयआरच्या नावाखाली आसामी नागरिकांची नावे मतदार यादीतून कशी वगळण्यात आली, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हिमंता शर्मा यांच्यावर आरोप

सीजेपी नेते आशुतोष रांका यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांच्यावर टीका केली. "मुख्यमंत्री हिमंता सरमा जेव्हा जेव्हा घाबरतात, तेव्हा तेव्हा पोलिसांना पुढे करतात," अशी जळजळीत टीका त्यांनी केली. सभेच्या ठिकाणची परिस्थिती सांगताना रांका म्हणाले की, "सभेकडे जाणारा संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. आसाम पोलीस अश्रुधूर घेऊन सज्ज आहेत. कोणालाही सभेच्या ठिकाणी पोहोचू दिले जात नाहीये आणि आमच्या स्वयंसेवकांना बळजबरीने ताब्यात घेतले जात आहे."आसाम सरकार कॉकरोचना इतके का घाबरते?" असा सवालही विचारला आहे.